ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा घेतली जाते. गावातील लोकांनी एकत्र यावे, लोकांच्या गरजा, काय आहेत, शासनाच्या योजनेची माहिती, विकास कामे , तसेच काही सूचना यांचे मार्गदर्शन ग्रामसभेमध्ये घेतली जाते.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे, कलम ७ अन्वये ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे.
ग्राम सभेचे सदस्य- ग्राम पंचायत क्षेत्रातील सर्व महसुली गावातील मतदार व्यक्ती (मतदार यादीत नाव असलेला १८ वर्षावरील प्रत्येक ग्रामस्थ) या ग्रामसभेच्या सदस्य असतात.
एका आर्थिक वर्षात किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे.
१. शासन वेळोवेळी आदेश देईल, त्यानुसार इतरही ग्रामसभा घेणे बंधनकारक राहील.
२. पहिली ग्रामसभा ही आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर एप्रिल-मे महिन्यात घेणे आवश्यक आहे.
३. दोन ग्रामसभेतील अंतर हे चार महिन्यापेक्षा जास्त नसावे.
४. ग्रामसभेचे विषय अंतिम करणेचे अधिकार सरपंच यांना आहेत. मात्र राज्य शासन, जिल्हा परिषद, पंचायत समितीने सुचविलेले विषय ग्रामसभेत घेणे हे सरपंचांना बंधनकारक आहे.
ग्रामसभेची पूर्व तयारी :
१. ग्रामसभेचे सदस्य हे त्या गावातील मतदार यादीतील सदस्य असतील.
२. ग्रामसभेची नोटीस ही लेखी स्वरूपात किमान ७ दिवस अगोदर देणे आवश्यक आहे. हे ७ दिवस मोजताना नोटीस काढलेचा दिवस व सभेचा दिवस सोडून देणे आवश्यक आहे. विशेष ग्रामसभेची नोटीस ही किमान ४ दिवसाची असणे आवश्यक आहे. यासाठी देखील नोटीस काढल्याचा दिवस व सभेचा दिवस वगळून चार दिवस असणे, आवश्यक आहे.
३. ग्रामसभेची प्रचार प्रसिध्दी दवंडीद्वारे व गावातील सार्वजनिक ठिकाणी नोटीस लावून करावी. तसेच मोबाईल एस. एम. एस. द्वारे प्रसिध्दी करावी.
४. ग्रामसभेची सूचना, नोटीस गावपातळीवरील सर्व शासकिय निमशासकिय कर्मचारी यांना दिली पाहिजे.
५. ग्रामसभेमध्ये ऐनवेळी घ्यावयाचे विषय लेखी स्वरुपात ग्रामसभेच्या तारखे पूर्वी दोन दिवस अगोदर सरपंच/ग्रामसेवकाकडे देणे आवश्यक असते. असा ऐनवेळचा विषय मांडण्यास परवानगी नाकारली तर संबंधितांना कळवावे लागते. कारण अशावेळी ऐनवेळच्या विषयामुळे सामाजिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा पोहोचेल असे असले तरच असा विषय नाकारणे, आवश्यक असते.
६. प्रत्येक ग्रामसभेपूर्वी सदस्यांनी आपआपल्या वॉर्डात वॉर्डसभा घेणे बंधनकारक आहे. सरपंच यांनी महिला सभा व पंचायतीची सभा ग्रामसभेच्या अगोदर घ्यावी. महिला सभा ग्रामसभेच्या आदल्या दिवशी तर पंचायतीची सभा ग्रामसभेच्या दोन दिवस अगोदर घ्यावी.
ग्रामसभेचे कामकाज :
- ग्रामसभेस किमान १०० किंवा एकूण मतदापंच्या १५ टक्के यापैकी जी संख्या कमी असेल ती गणपूर्तीची संख्या समजण्यात येईल.
- ग्रामसभेचे पदसिद्ध अध्यक्ष सरपंच हे असतील.
- सरपंचांच्या अनुपस्थितीत उपसरपंच अध्यक्षस्थानी असेल; आणि सरपंच व उपसरपंच या दोघांच्या अनुपस्थितीत, ग्रामसभेच्या त्या सभेस उपस्थित असलेला वयाने सर्वात जेष्ठ असणारा पंचायतीचा सदस्य अध्यक्षस्थानी असेल. पंचायतीचा कोणताही सदस्य उपस्थित नसेल त्याबाबतीत, ती ग्रामसभा एक आठवड्याच्या कालावधीसाठी तहकूब करण्यात येईल, आणि अशा तहकुबीनंतर पुन्हा भरविण्यात आलेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच असेल आणि त्याच्या अनुपस्थितीत उपसरपंच अध्यक्षस्थानी असेल; आणि सरपंच व उपसरपंच या दोघांच्या अनुपस्थितीत, ग्रामसभेच्या त्या सभेस उपस्थित असलेला वयाने सर्वात जेष्ठ असणारा पंचायतीचा सदस्य अध्यक्षस्थानी असेल. अशा सभेत पंचायतीचा कोणताही सदस्य उपस्थित नसेल तर गट विकास अधिकाऱ्याने त्याबाबतीत प्राधिकृत केलेला अधिकारी अध्यक्षस्थानी असेल.
- आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेमध्ये पंचायतीचा मागील आर्थिक वर्षाचा प्रशासन अहवाल, जमा-खर्चाचे लेखा-विवरण, लेखापरिक्षण अहवाल, लेखा परिक्षणास दिलेली उत्तरे व चालू वर्षाचा विकास कार्यक्रम हे विषय घेणे बंधनकारक आहे (कलम ८ अन्वये). हे विषय ग्रामसभेमध्ये मान्यतेसाठी न ठेवल्यास सरपंचाला पदावरुन दूर करण्याची कारवाई होऊ शकते.
- इतर ग्रामसभेमध्ये प्रामुख्याने विकास कामांचा आराखडा, वैयक्तीक लाभाच्या योजनांतर्गत लाभार्थी निवड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आर्थिक आराखडा, सामाजिक लेखा परिक्षण, आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकास मान्यता व विविध योजनांमधून घ्यावयाच्या कामांचा समावेश करणे आवश्यक आह
- ग्रामसभेस ग्रामस्तरावरील शासकीय व निमशासकीय कर्मचारी व अधिकारी (जसे की तलाठी, कृषि सहाय्यक, वनपाल, शिक्षक, वायरमन, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेवक इत्यादी) यांनी उपस्थित राहून त्यांच्या कामाचा आढावा ग्रामसभेस देणे त्यांना बंधनकारक आहे.
- ग्रामसभेचे व्हिडीओ चित्रिकरण करणे, फोटो काढणे आवश्यक आहे (शासन परिपत्रकान्वये).
- ग्रामसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे अध्यक्ष यांनी किंवा ते ज्यांना आदेशीत करतील त्यांनी देणे बंधनकारक आहे.
- एका आर्थिक वर्षात सरपंच किमान चार ग्रामसभेपैकी एकही ग्रामसभा घेण्यास चुकल्यास तो कारवाईत अपात्र होऊ शकतो.
- ग्रामसभेसाठी मतदारांची उपस्थिती तसेच महिलांची उपस्थिती वाढविण्यासाठी प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी ग्रामपंचायतीने खबरदारी घ्यावी.
- ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी ग्रामसभेस उपस्थित राहणे आवश्यक आहे.
ग्रामसभेच्या ठरावांची अंमलबजावणी
- ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी सरपंच/ग्रामसेवक यांनी करणे अभिप्रेत आहे.
- ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांबाबत संबंधित विभागांशी विहित वेळेत पत्रव्यवहार करण्याची जबाबदारी ग्रामसेवकाची राहिल. सरपंच यांनी याचा पाठपुरावा करुन कामे करुन घेणे अभिप्रेत आहे.
- ग्रामसभेचे इतिवृत्त पंचायत समितीकडे ७ दिवसात सादर करणे आवश्यक आहे.
ग्रामसभा घेणेसाठी सचिव / ग्रामसेवक यांनी टिपणी रजिस्टर ठेवून टिपणी लिहावी व ती सरपंचाकडे सादर करावी. त्यावर सरपंचाची मान्यता घेणेत यावी. सदर टिपणीवर सही करण्यास अथवा ग्रामसभा घेण्यास सरपंचानी नकार दिल्यास तशी नोंद टिपणीत नोंदवावी. त्यानंतर सदर टिपणी उपसरपंच यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करावी.. उपसरपंचानी नकार दिल्यास तशी टिपणीत नोंद करुन सचिव / ग्रामसेवक यानी ग्रामसभा बोलवावी. अशा ग्रामसभेस सरपंच, उपसरपंच अनुपस्थित राहिल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. तसेच सरपंच, उपसरपंच यांनी ग्रामसभा बोलविण्यास नकार दिल्यास व ग्रामसेवकांनी ग्रामसभा न बोलविल्यास ग्रामसेवकाविरुध्द शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.
ग्रामसभा तहकूब झाल्यास
कोरम अभावी ग्रामसभा तहकूब झाल्यास तहकूब दिवशीच पुढील ७ दिवसांची नोटीस काढून ग्रामसभेचा दिनांक निश्चित करावा. त्या दिनांकास घेण्यात येणाऱ्या तहकूब केलेल्या ग्रामसभेचे कामकाज करणेसाठी कोरम गणपूर्तीची आवश्यकता भासत नाही. मात्र तहकूब ग्रामसभेत ऐनवेळचे किंवा नवीन विषय घेता येणार नाहीत. ग्रामपंचायतीमध्ये एकापेक्षा जास्त गावे असल्यास पहिली ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या ठिकाणी घेणेत यावी व पुढील ग्रामसभा इतर गावांच्या नावाच्या इंग्रजी वर्णमालेतील अक्षरानुसार क्रमवारीने घेण्यात याव्यात.
ग्रामसभेस ग्रामसेवक उपस्थित नसेल तर
विशेष परिस्थितीत ग्रामसभेस ग्रामसेवक उपस्थित नसेल तर सरपंच, ग्रामसभेचे कार्यवृत्त लिहिण्यासाठी गावात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी जसे शिक्षक, तलाठी, अंगणवाडी सेविका यासारख्या शासकिय-निमशासकिय किंवा पंचायत कर्मचारी यांची नियुक्ती करेल.
हेही वाचा …….. ग्रामपंचायत मासिक सभा नियम व संपूर्ण माहिती